आई - तुझ्यासाठी..
२५ January 2024 ला आई गेली, आणि तिची हॉस्पिटल मधली १० दिवसांची झुंज अखेर संपली.
लगेच पुढची लगबग सुरु झाली. फोन, मेसेजेस चा भडिमार - अर्थातच.
तिने बरेच लोक जोडली होती, त्यामुळे तिची बातमी कळताच घरात खूप लोकांचा वावर झाला. प्रत्येकाशी तेच तेच बोलायला आवघड जात होते, पण प्रत्येक जण दुःखात सामील होते. एकंदर बोलण्याचा विषय हाच होता की आईचं आयुष्य कसं खडतर गेलं. खूप कष्ट घेतले, पण कधी कोणाला बोलून दाखवलं नाही वगैरे वगैरे. आम्ही ह्या सगळ्यातून गेल्या मुळे पटत तर होतच.
पण आज एक खुलासा करावा वाटतोय - तिचं आयुष्य खडतर नक्कीच होतं, पण ते सुखी ही तितकंच होतं.
बाबांची नोकरी सरकारी (त्याकाळी सरकारी नोकरी ला खूपच महत्त्व होतं!), आणि मुख्यतः त्यांच्या बदल्या सगळ्या निसर्गरम्य ठिकाणी झाल्या. कॅन्टोन्मेंट च स्वच्छ आवर, आणि सगळ्या सोयी उपलब्ध. घरं टुमदार, समोर समुद्र किव्वा छान झाडी. बाबांचा पगार तसा बेतचाच, पण दोघं त्यात समाधानी असायचे. पुढे बाबांचं promotion झालं आणि सेवेला ऑफिस ची गाडी आणि ड्रायव्हर ही हजर. हाताशी २ मुलं. अभ्यासात आम्ही average, पण आम्ही चांगले स्थिर स्तावर झालो म्हणायला हरकत नाही. आमची लग्न पार पडली, आणि नंतर आईला २ गोड नातीही लाभल्या.
ह्या सगळ्या सुखाला अर्थातच होते ते चिंतेचे ग्रहण. चींतेच कसं आहे, की ती जेवढी घेऊ तेवढी कमीच असते. आणि आईच्या आजूबाजूची परिस्थिती मुळात वेगळ्या विश्वाची होती. इथे सर्दी, खोकला, ताप, पैसे किव्वा मुलं अभ्यास करून प्रगती करतील का ह्या चिंता नव्हत्या. बाबांची तब्येत, त्यात त्यांची नोकरी पार पडेल का, की ती बिघडत जाऊन ते हंथरूनाला तर खिळणार नाहीत. विषय असायचे neurosurgeon, MRI scan आणि औषधे.
पुढे जाऊन बाबांनी नोकरी पूर्ण केली आणि २०१० मध्ये रिटायर झाले. पण त्यांच्या तब्येतीची काळजी ही नेहमीच असायची. बहुतेक ह्याच काळजी ने आईला कॅन्सर ने विळखा घालायला सुरुवात केली असावी.
२०१९ मध्ये तिला पोटात गाठ आहे हे कळालं, आणि त्यासाठी ऑपरेशन झालं. त्या गाठीचा तो गोळा बघितला आणि माझ्याच पोटात गोळा आला. इतकी मोठी गाठ पोटात होती हे आधी कसं समजलं नाही ह्याचे आश्चर्य वाटले. तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की ती गाठ अचानक तयार झाली नसून, ती किमान गेले १० वर्षांपासून सुरू असेल. ती गाठ तर काढली गेली, पण मग आईची गाठ कॅन्सरशी पडली.
डॉक्टरांच्या फेऱ्या, chemotherapy, औषधे, आणि चिंता - ह्यावेळी मात्र स्वतः साठी.
२०२० मध्ये बाबा गेले. खूप वाईट वाटलं, पण त्यांची सुटका झाली अशी समजूत घातली. आईसाठी एक आशेचा किरण दिसला - की ती आता स्वतः साठी जगू शकेल. बाबांच्या तब्यातेची चिंता नाही, आणि सतत स्वतः परिस्थितीला जुळवून घेण्याची गरजही नाही. तिला आम्ही सांगितलेच होते की आता मस्त जग, फिरून घे, मैत्रिंनिंकडे जा, मज्जा कर.
तिने तसं करायला थोडीफार सुरुवात ही केली होती. पण एखाद्याचं अयुष्य अवघड अस्तं ते हेच. तिचा कॅन्सर हळू हळू वाढत गेला, आणि तिला परत ग्रासलं ते स्वतः च्या चिंतेने. तिने कडवी झुंज दिली, पण तिच्या पोटात दुखायला लागलं तेव्हा ती हताश झाली.
“आता माझं काही खरं वाटत नाही” असे विचार ती बोलून दाखवायला लागली. प्रत्येक दुखण्याची एक सीमा असते, आणि ती पार झाली होती. शेवटचे १० दिवस खूप हाल झाले. “तू जिंकलास बाबा, आता घेऊन जा मला” अशीच बहुदा ती कॅन्सर ला आणि देवाला म्हणाली असावी.
बाकीच्या कॅन्सरशी निगडित सवयी तर सोडाच, कधी मास मत्स्य ही न खाणाऱ्या व्यक्तीला कॅन्सर एवढा त्रास देऊ शकतो हे जवळून अनुभवलं. बाकी मी काही तज्ञ नाही, पण मला खात्री आहे की ह्या आयुष्य भराच्या चींतेनेच कॅन्सर ला होण्याचा आणि पसरण्याचा वाव मिळाला असावा.
आईची तिच्या हालातून आणि मुख्यतः चींतेतून सुटका झाली ते बरच झालं. पण आई हयात असताना ही सुटका बघायला मिळाली असती तर फार फार आनंद झाला असता.
असो - आई आणि बाबा आता चिंतामुक्त कुठे तरी मस्त फिरत असतील.
तिच्या जाण्याने तिला आमच्याबद्दल चिंता असेल, पण तिच्याच शब्दात थोडक्यात सांगायचे तर -
आई, आम्ही बरे आहोत..
आम्ही बरे आहोत..
![](https://static.wixstatic.com/media/ec941c_5a62a5fc927b4e04bf11b9647f48cee3~mv2.png/v1/fill/w_980,h_735,al_c,q_90,usm_0.66_1.00_0.01,enc_auto/ec941c_5a62a5fc927b4e04bf11b9647f48cee3~mv2.png)
आईच्या स्मरणर्थ
भरत बर्वे
८ फेब्रुवारी २०२४
Comments